कराड (सातारा) - एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याच्या चार महिन्याच्या पिल्लाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कराड-पाटण मार्गावर विहे गावच्या हद्दीत घडली आहे. पिल्लाची मादी याच परिसरात असावी, या शक्यतेमुळे विहे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
मंगळवारी (दि. २९) रात्री साडे आठच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचे अंदाजे चार महिन्याचे पिल्लू जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याच्या मृत पिल्लाला कराड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून शवविच्छेदन केले. त्यानंतर कराड वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात दहन करण्यात आले.
कराड आणि पाटण परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्यामुळे बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीपर्यंत येऊ लागले आहेत. मागील पंधरा दिवसांपुर्वी उरूल घाट-शितळवाडी या मार्गावर दोन मोटरसायकलस्वारांवर बिबट्याने हल्ला केला होता.
‘मन की बात’ मध्ये बिबट्यांच्या आकडेवारीचा उल्लेख -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ डिसेंबरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये बिबट्यांची संख्या वाढल्याचे सांगितले. बिबट्यांची संख्या वाढवून भारताने संपूर्ण जगाला एक मार्ग दाखवल्याचे मोदी म्हणाले होते. देशात चार वर्षात बिबट्यांची संख्या 12 हजारांवर गेली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशातील बिबट्यांच्या संख्येचा एक अहवाल जाहीर केला. मध्य भारत आणि पूर्व घाटात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे. या क्षेत्रात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
बिबट्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज आहे, हे मंगळवारी झालेल्या अपघातातून समोर आले आहे.