सातारा : एसटी स्टँडवर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या मावस बहिणींना लोणंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे लातूरमधून इनोव्हा कारने येऊन त्या एसटी स्टँडवर चोरी करायच्या. याप्रकरणी हौसाबाई नामदेव कांबळे, नरसिंग कोंडीबा बन ( दोघेही रा. उदगीर-गांधीनगर, जि. लातूर) आणि हरणाबाई बाबू सकट (रा. देगलूर, जि. नांदेड) यांना अटक करण्यात आली आहे.
लोणंद पोलिसांची मोठी कारवाई : एसटी स्टँडवर बसमध्ये चढताना वृद्ध महिलांचे दागिने चोरीला गेल्याचे गुन्हे लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा तपास करताना सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इनोव्हा कार आणि संशयित आरोपी निष्पन्न केले. दोन महिलांसह कार चालकाला बेड्या ठोकून अनेक गुन्हे उघडकीस आणले. दोन्ही संशयित महिला मावस बहिणी आहेत.
१६ गुन्ह्यांची कबुली : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून इनोव्हा कारमधून येऊन त्यांनी लोणंद, वाई, औरंगाबाद ग्रामीण, कवठे महांकाळ, सांगली शहर, नाशिक, ओतूर (पुणे), लोणीकंद (पुणे) या पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ गुन्हे केल्याची कबुली संशयित महिलांनी दिली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील १० तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि इनोव्हा कार असा एकूण १५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आंतर जिल्हा टोळी जेरबंद : एसटी स्टँडवरील गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणारी तीन जणांची आंतर जिल्हा टोळी लोणंद पोलिसांनी जेरबंद केल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, फलटणचे डीवायएसपी तानाजी बरडे यांनी लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.