कराड (सातारा) - लतादीदी आठ वर्षांच्या असताना वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या नाटकाच्या प्रयोगानिमित्त कुटुंबासह कराडमध्ये महिनाभर वास्तव्यास होत्या. १९३६ च्या दरम्यानची ही घटना आहे. रॉयल टॉकीजसमोरील मुतालिक वाड्यात मंगेशकर कुटुंब वास्तव्यास होते, अशी आठवण 'कर्हाड : समग्र दर्शन' या पुस्तकाचे लेखक विद्याधर गोखले यांनी सांगितली. तसेच, पाटण तालुक्यातील तीर्थक्षेत्र चाफळमधील श्री. राम मंदिरातही दर्शनासाठी त्या दोनवेळा येऊन गेल्या होत्या.
रॉयल टॉकीजमध्ये नाटकाचे प्रयोग आणि मुतालिक वाड्यात वास्तव्य...
लतादीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर हे नाटकाच्या प्रयोगासाठी कराडला येत असत. त्यावेळी त्यांचे कुटुंब त्यांच्यासमवेत असायचे. त्याकाळी आठवड्यातून तीन वेगवेगळ्या विषयावरची नाटके सादर व्हायची. नाटकाच्या प्रयोगापूर्वी नाटकाच्या ठिकाणची तयारी तसेच, मुक्कामाची देखील पूर्वतयारी करावी लागायची. त्यामुळे, एका ठिकाणी त्यांना महिनाभर मुक्काम करावा लागायचा. कराडमधील पहिले थिएटर रॉयल टॉकीजमध्ये मूक चित्रपटाबरोबरच नाटकाचे देखील प्रयोग होत असत. चित्रपटाचा पडदा आणि पडद्यासमोर नाटकासाठीही जागा होती, असे विद्याधर गोखले सांगतात. नाटकाच्या निमित्ताने कराडला आल्यानंतर रॉयल टॉकीजसमोरच्या मुतालिक वाड्यात मंगेशकर कुटुंब राहत असे. १९३६ मध्ये आठ वर्षांच्या लतादीदी महिनाभर कुटुंबासह मुतालिक वाड्यात वास्तव्यास होत्या, अशी आठवण गोखले यांनी सांगितली. तो मुतालिक वाडा सध्या अस्तित्वात नाही. आता वाड्याच्या जागेवर कृष्णाबाई प्रीतिसंगम सांस्कृतिक केंद्राची वास्तू आहे.
सिद्धीविनायक ट्रस्टमधून विलासकाकांनी मंगेशकर ट्रस्टला दिली होती देणगी...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर हे १९९९ - २००३ या दरम्यान विधी व न्याय मंत्री होते. त्यावेळी लता मंगेशकर यांनी दीनानाथ मंगेशकर ट्रस्टसाठी देणगीची मागणी केली होती. त्यावेळी सिद्धीविनायक ट्रस्टमधून विलासकाका उंडाळकरांनी दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला अडीच कोटींची देणगी दिली होती. यानिमित्ताने त्या मुंबईतील ज्ञानेश्वरी शासकीय बंगल्यावर आल्या होत्या. मंत्री उंडाळकर आणि पत्नी आशादेवी यांच्या समवेत लतादीदींनी फोटोही घेतला होता. लतादीदींच्या निधनानंतर या सर्व गोष्टींना समाज माध्यमांवर उजाळा दिला जात आहे.
चाफळच्या श्री. राम मंदिरातही दर्शनासाठी आल्या होत्या लतादीदी
लतादीदी यांचा सातारा, कराड आणि पाटण या तालुक्यात विविध कारणांनी संबंध आल्याने सातारा जिल्ह्याशी ऋणानुबंध निर्माण झाला होता. २००१ साली त्या दोनवेळा चाफळ (ता. पाटण) येथील श्री. राम मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. पाटण तालुक्यातील चाफळ हे तीर्थक्षेत्र आहे. रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे ही भूमी पावन मानली जाते. त्यामुळे चाफळ तीर्थक्षेत्राला अनेक कलावंत भेट देत असतात. लतादीदींनी देखील चाफळच्या राम मंदिरात येऊन श्री. रामाचे दर्शन घेतले होते. तसेच, त्यानंतर बंधू ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या समवेत त्या पुन्हा दर्शनासाठी चाफळला आल्या होत्या.
हेही वाचा - Bully Buy App Case: बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपी श्वेता सिंगच्या जामीनावर बुधवारी सुनावणी