सातारा - कराड शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. आता ते ४ फुटांनी कमी झाले असून पूर ओसरत आहे. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे कराडचे उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.
कोयना आणि धोम धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात अनुक्रमे कोयना आणि कृष्णा नद्यांमध्ये विसर्ग करावे लागत आहे. पण आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्ग कमी होऊ शकतो. कराड शहरातील दत्त चौकापर्यंत आलेले पाणी सकाळी ९ वाजेपर्यंत चार फुटांनी ओसरले आहे. मंगळवारी रात्रीच एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. जिथे आवश्यकता भासेल तिथे या टीम मधील लोक पाठवले जातील, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
पावसामुळे वाहतुकीवर परिणाम
- पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ४ हा सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवला जाणार आहे.
- कोल्हापूर येथील पाणी पातळी कमी न झाल्याने महामार्गावर काही ठिकाणी 4 फुटापर्यंत पाणी आहे. यामुळे आज बुधवारी दुसऱ्या दिवशीही वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
- या महामार्गावर मंगळवारी जड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी होती. मात्र, आता हळूहळू लहान वाहनेही बंद ठेवली जाणार आहेत.