सातारा - कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यात गुरूवारी बहुतांशी ठिकाणी तुरळक पाऊस पडला. मात्र, बुधवारी धरणांतर्गत विभागात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 7 हजार 88 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
तब्बल 68 किलोमीटर शिवसागर जलाशयात दमदार पाऊस झाला असला, तरी पडणाऱ्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर जमिनीत मुरत असल्याने त्याचा धरणातील पाणीसाठ्यातील वाढीवर अद्याप सकारात्मक परिणाम पहायला मिळत नाही. त्याचवेळी धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 111 क्युसेक पाणी पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येत असल्यानेही येणारे व जाणाऱ्या पाण्याचाही एकूण साठ्यावर परिणाम पहायला मिळत आहे.
कोयना धरणात सध्या एकूण पाणीसाठा 33.93 टीएमसी इतका झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा 28.93 टीएमसी इतका झाला आहे. धरणातील पाण्याची उंची 2083.8 फूट इतकी झाली आहे. तर कोयना येथे 168 मिलीमीटर, नवजा 147 मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे 223 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, बुधवारी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी छोट्या-मोठ्या नद्या ओढ्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. मात्र, गुरूवारी पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर कोयना नदीसह अन्य नद्या, ओढ्यांच्या पाणी पातळीतही कमालीची घट पहायला मिळाली. शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरक वातावरण तयार झाल्याने बळीराजा आपल्या शेती कामाला लागला आहे.