कराड (सातारा) - महाराष्ट्राची भाग्यरेखा असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा १०५ टीएमसी झाला आहे. धरण शंभर टक्के भरल्याने सिंचन, वीजनिर्मितीसह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही क्षणी धरणातून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू केला जाणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी एवढी असून धरणातील पाणीसाठा १०५.१४ टीएमसी आहे. यंदा कोयना धरणाच्या पायथा वीजगृहासह ६ वक्र दरवाजांमधून ऑगस्ट महिन्यात कोयना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे, कोयना आणि कृष्णा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली होती. यंदा १५ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा कोयना धरणाचे वक्र दरवाजे उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यावेळी पावसाचा जोर प्रचंड होता. २४ तासांत धरणात ५ टीएमसी इतकी विक्रमी आवक झाली होती, तर पाणीसाठा ९०.५७ टीएमसी होता. पावसाचा जोर कायम राहिल्याने पाणीसाठाही वाढत होता. त्यामुळे, विसर्गात वाढ करण्यात येत होती.
१६ ऑगस्ट रोजी धरणाचे दरवाजे १० फुटांवर नेण्यात आले होते. १९ ऑगस्ट रोजी सकाळी धरणाचे दरवाजे दहा फुटांवरून ५ आणि सायंकाळी ५ फुटांवरून दीड फुटांवर आणण्यात आले. २० ऑगस्टला धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. मात्र, धरणातील आवक जास्त असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी २१ ऑगस्टला पुन्हा दरवाजे ४ फुटांनी उचलावे लागले होते. सध्या कोयना धरणातील पाणीसाठा १०५.१४ टीएमसी आहे. सध्या सर्वत्र परतीचा पाऊस पडत आहे. मागील १७ तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे २३ मि. मी, नवजा येथे २० मि. मी आणि महाबळेश्वर येथे ६ मि. मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे, धरण ९९.९० टक्के भरले आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे पायथा वीजगृह कार्यान्वित केले जाणार असून वेळप्रसंगी धरणाचे दरवाजेही उघडण्यात येतील, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.
कोयना धरणातील पाणीसाठा आणि विसर्गाची सद्यस्थिती
सध्या कोयना धरणात १००.२५ टीएमसी इतका पाणीसाठा असून, पायथा वीज गृहातून २ हजार १०० क्युसेक आणि धरणाच्या वक्र दरवाजातून ७ हजार १७४ क्युसेक, असा एकूण ९ हजार २७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. धरणाचे दरवाजे ९ इंचाने उघडण्यात आलेले असून ते स्थिर ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा- ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्यावर माहुली येथे अंत्यसंस्कार