कराड (सातारा) - कोयना धरण परिसर सकाळी 9 वाजून 47 मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. भूकंपामुळे कोठेही हानी झाली नसल्याची माहिती कोयना धरण प्रकल्पाच्या सुत्रांनी दिली. दरम्यान, नवीन वर्षातील भूकंपाचा हा दुसरा धक्का आहे.
कोठेही पडझड नाही -
कोयना धरण परिसरात भूकंपाची मालिका कायम आहे. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास धरण परिसरात 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नवीन वर्षातील भूकंपाचा हा दुसरा धक्का आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 10 किलोमीटर अंतरावर असणार्या काडोली गावच्या पश्चिमेस 7 किलोमीटर अंतरावर होता. कोयनानगर, पाटण, अलोरे या भागाला भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपामुळे पाटण तालुक्यात कोठेही पडझड अथवा हानी झालेली नाही, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाच्या सुत्रांनी दिली आहे. 8 जानेवारी रोजी यंदाच्या वर्षातील पहिला भूकंप झाला होता. 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंपाचा धक्का कोयना धरण परिसरात जाणवला होता.
गतवर्षात 128 भूकंपांची नोंद
कोयना धरण परिसरात 2021 सालात सौम्य आणि अति सौम्य भूकंपाची मालिका सुरू होती. भूकंप मापन केंद्रावर मागील वर्षभरात तब्बल 128 भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली. त्यामध्ये 3 रिश्टर स्केलच्या 119 आणि 3 ते 4 रिश्टर स्केलच्या 9 धक्क्यांचा समावेश होता. भूकंपांच्या मालिकेमुळे नागरिक भयभीत झाले होते.