सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ७०.२९ टीएमसी झाला आहे. त्यापैकी ६६.७८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
मागील आठवड्यापासून कोयनाच्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त होत असून गेल्या १७ तासांमध्ये झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झालीय. कोयना धरणाची एकूण क्षमता १०५ टीएमसी असून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे.
धरणात प्रति तास ३४ हजार १६३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मागील १७ तासांमध्ये कोयनानगर येथे ४१, नवजा येथे ६७, महाबळेश्वर येथे ३५, वाळवण येथे २५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढला आणि पाणीसाठा ८० टीएमसीहून अधिक झाल्यास धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे कोयना धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.