कराड (सातारा) - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, ईद, शिवजयंती आणि अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये पोलिसांनी पथसंचलन केले. संचारबंदीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये. पोलिसांनी कारवाईस भाग पाडू नये. सण घरात राहूनच साजरे करावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले.
मुख्य मार्गावरून संचलन
कराड शहर आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनामुळे मृत्यूदरही वाढला आहे. गंभीर परिस्थिती असतानादेखील नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. रस्त्याने फिरत आहेत. त्यातच सलग सण आल्याने कराड शहर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी कराडमधील मुख्य मार्गावरून संचलन केले. 5 अधिकारी, 45 पोलीस कर्मचारी आणि 20 होमगार्ड संचलनात सहभागी झाले होते.
पोलिसांवर मोठी जबाबदारी
कराड शहर पोलीस ठाण्यापासून संचलन सुरू झाले. दत्त चौक, बसस्थानकमार्गे, सिटी पोस्ट ऑफीस, बुधवार पेठमार्गे, भाजी मंडई, गुरूवार पेठ, चावडी चौकमार्गे कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा, दत्त चौकमार्गे शाहू चौक या मार्गावरून संचलन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. या काळात पोलिसांवर मोठी जबाबदारी आली आहे. स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेऊन ही जबाबदारी पोलिसांनी पार पाडायची आहे. कराडकरांनी संचारबंदीत पोलिसांना चांगले सहकार्य केले आहे. ईद, शिवजयंती आणि अक्षय्य तृतीया घरात राहूनच साजरी करावी. यापुढेही पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले.