सातारा - कराड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. शासनाच्यावतीने शेतकर्यांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी केले जाणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन रंगराव थोरात यांनी दिली.
सोयाबीन खरेदीसाठी कराड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा घेण्यासाठी शेतकर्यांनी 2020-21मध्ये सोयाबीन पीक पेरणीची नोंद असलेला सातबाराचा उतारा, आधार कार्ड आणि आधार नंबर लिंक असलेल्या राष्ट्रीयीकृत बँक किंवा सहकारी बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, या कागदपत्राची पूर्तताकरून ऑनलाइन नोंदणी करावी. कोयना खत कारखान्याशेजारील खरेदी-विक्री संघाच्या शाखेत ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था करण्यात आल्याचे रंगराव थोरात यांनी सांगितले.
शासनाच्या योजना, प्रमाणित बियाणे, खते तसेच अत्याधुनिक शेती औजारांची सहकारी तत्त्वावर विक्री करणारा संघ, असा कराड तालुका खरेदी-विक्री संघाचा लौकीक आहे. येथे हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून खरेदी-विक्री संघाने शेतकर्यांची चांगली सोय केल्याची प्रतिक्रिया शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे.