कराड (सातारा) - कराडच्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचा कोरोना अहवाल बुधवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नगरसेवक आणि संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, नगराध्यक्षांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडीच्या चालकास क्वारंटाईन करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नगराध्यक्षांची प्रकृती बिघडली होती. लक्षणे दिसल्याने बुधवारी त्यांनी कृष्णा रूग्णालयात स्वॅब दिला होता. बुधवारी सायंकाळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कराडमध्ये खळबळ उडाली. कोविडच्या अनुषंगाने होणाऱ्या बैठका, कंटेन्मेंट झोनला भेटी, बाधित झालेल्या रूग्णांच्या घरी भेटी, शासकीय बैठका, मदतकार्याच्या ठिकाणी त्यांची उपस्थिती होती. शहरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी फायर फायटर गाडीबरोबर संपूर्ण शहरात त्या फिरल्या होत्या.
हेही वाचा - वडगाव मावळमध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एकावर गोळीबार; पोटात तीन गोळ्या लागल्या
गेल्या दोन दिवसांपासून ताप आल्याने नगराध्यक्षांनी कृष्णा रूग्णालयात स्वॅब टेस्ट केली. सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नगराध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या जय भारत कॉलनीत आरोग्य विभागाने फवारणी केली. नगराध्यक्षांच्या संपर्कात असलेल्या अधिकारी, कर्मचारी, नगरसेवकांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
बुधवारी कृष्णा मेडीकल कॉलेज येथील तपासणी अहवालानुसार 12 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. यात कराड शहरातील शुक्रवार पेठेतील 52 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 61 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 31 वर्षीय महिला (नगराध्यक्षा), सवादे येथील 38 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 35 वर्षीय महिला, 49 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 42 आणि 45 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 41 वर्षीय महिला, कोडोली येथील 31 वर्षीय महिला, तसेच पाटण तालुक्यातील महिंद येथील 92 वर्षीय महिलेचा समावेश आहे. अँन्टिजेन चाचणीत शामगाव (कराड) आणि कराड शहरातील प्रत्येकी एक, असे एकूण दोन जण पॉझिटिव्ह आलेले आहेत.