सातारा - कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५७ कोटी रुपयांच्या निधीस उपमुुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे महत्वकांक्षी कास धरण प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कास धरणाचे काम पुर्णत्वास नेण्यासाठी सुधारीत प्रस्तावास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
सध्यस्थितीत कास धरण प्रकल्पाचे काम ८० टक्के पुर्ण आहे. मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून काम रखडले होते. महाआघाडी मंत्रीमंडळाच्या स्थापनेनंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काससाठी वाढीव निधी देण्याची मागणी केली होती. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात आज बैठक झाली.
या बैठकीला पवार यांच्यासह शिवेंद्रसिंहराजे, पाणीपुरवठा, नगर विकास, वित्त व नियोजन, जलसंपदा विभागाचे सचिव, संबंधीत सर्व विभागांचे अधिकारी तसेच या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट हेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते.
बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर अजित पवार यांनी वाढीव ५७ कोटींचा निधी नगरविकास विभागामार्फत नगरोत्थानमधून उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर कामाचा सुधारीत वाढीव निधी मागणी प्रस्ताव येत्या सात दिवसांत देण्याच्या सुचना पवार यांनी सातारा पाटबंधारे विभागाला केल्या.
दरम्यान, या निधीसह सातारा कास ते बामणोली या बाधीत रस्त्याच्या कामासाठीही ६ कोटी निधीची वेगळी तरतूद करुन हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचा निर्णय पवार यांनी बैठकीत घेतल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.