सातारा - खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण (के. एम.) साखर कारखान्यातील जगदीप धोंडीराम थोरात (वय 40, रा. गोवारे, ता. कराड) या अधिकार्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृताच्या नातेवाईकांनी एका माजी आमदारासह विधानसभेची दोनवेळा निवडणूक लढवलेल्या नेत्यावर मारहाणीचा आरोप केल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे कराडामध्ये तणाव निर्माण झाला होता.
कारखान्यात झाली होती मारहाण -
जगदीप थोरात हे पडळ येथील के. एम. साखर कारखान्यामध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून कार्यरत होते. कारखान्यात अफरातफर झाल्याच्या घटनेला जबाबदार धरून थोरात यांना मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (10 मार्च) घडली. नातेवाईकांनी गुरूवारी पहाटे त्यांना कराड येथील रुग्णालयामध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना सकाळी साडे नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. जगदीप थोरात यांना जबर मारहाण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. संशयीतांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेनावेळी मृताच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले आहेत. रात्री उशीरा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन गोवारे या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले, अशी माहिती कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.
राजकीय नेत्यांवरील आरोपांमुळे खळबळ -
या संदर्भात कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून मृताच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपाबाबत जबाब घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले. मृत जगदीश थोरात यांना दिवसभर जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. मृताच्या नातेवाईकांनी राजकीय नेत्यांवर आरोप केल्यामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.