सातारा - कोयना, कास, ठोसेघर सारखेच वाईजवळील 'जोर-जांभळी'च्या जंगलात पर्यटकांचा राबता वाढू लागला आहे. अनेक वन्यजीवांचा अधिवास असलेल हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटनाचे नवे डेस्टिनेशन बनू पाहत आहे.
पश्चिम घाटातील जोर-जांबळीचे खोरे वन्यजीवांचा कॅरिडोर आहे. वाईपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर ६ हजार ५११ हेक्टर क्षेत्रात हे जंगल पसरलेले आहे. या जंगलात समृद्ध जैवसाखळी आहे. बिबट्या, अस्वल, लांडगा, कोल्हा, वाघाटी, सांबर, गवा, भेकर, चौसिंगा, हरिण, साळिंदर, उदमांजर, पिसेरा, कलिंदर, तरस आदी वन्यप्राणी आढळतात. याठिकाणी सरपटणारे प्राणी, पक्षी, झाडे, गवत, झुडपे, गौण उत्पादन आदी मुबलक प्रमाणात आढळते. या जंगलात रान कुत्र्यांची संख्या लक्षणीय आहे.
जोर-जांभळी संवर्धन राखीव क्षेत्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. त्याला हा दर्जा मिळाल्यास केंद्र व राज्य शासनाकडून संरक्षण व संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल. पर्यटकांसाठी अधिक सुविधा निर्माण करता येतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे एकाही कुटुंबाला विस्थापित व्हावे लागणार नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नच येणार नाही, अशी माहिती वाईचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी दिली.
वनविभागाला या क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी निधी व सुविधा मिळाल्या तर बाहेरून या भागात प्राणी आणून सोडले जातील. जुन्या पायवाटा बंद होतील, जनावरांना चराईबंदी केली जाईल, असे गैरसमज स्थानिकांमध्ये पसरवले जात आहे. वन्य प्राण्यांचा शक्यतो अधिवास बदलला जात नाही. त्यामुळे या अफवांमध्ये तथ्य नसल्याचे वनक्षेत्रपाल झांजुर्णे यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यात कोयना, कास, ठोसेघर, शिवसागर, महाबळेश्वर, पाचगणी याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना जोर-जांभळी हे नवे डेस्टिनेशन मिळणार आहे. निरीक्षण मनोरे, पाऊलवाटा, टेन्ट हाऊस, तसेच स्थानिकांच्या सहभागातून निवास-न्याहारी योजना असे अनेक पर्यटनासाठी आवश्यक उपक्रम येथे राबवण्यात येतील. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल, असेही वनक्षेत्रपाल म्हणाले. जोर-जांभळी वनक्षेत्र संवर्धन राखीवचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात आहे. यामुळे प्राण्यांचे संवर्धन होण्याबरोबरच पर्यटन विकासाला चालना मिळेल, अशी माहिती सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी दिली.