सातारा: विजय दिवस समारोह समितीचा यंदाचा 'जीवन गौरव यशवंत पुरस्कार' ( Jeevan Gaurav Yashwant Award ) सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील ( MP Srinivas Patil ) यांना जाहीर झाला आहे. ब्रिगेडीयर जेम्स थॉमस आणि साताऱ्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. १५ डिसेंबरला या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचिव संभाजीराव मोहिते यांनी दिली आहे.
सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान: विजय दिवस समारोह समितीतर्फे आतापर्यंत सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांना जीवन गौरव यशवंत पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील, माजी आमदार संभाजीबाबा थोरात, खासदार शरद पवार, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले, स्वातंत्र्य सेनानी नागनाथ आण्णा नायकवडी, आचार्य शांताराम गरुड, भाई संपतराव पवार, अशोक गोडसे, क्रीकेटर चंदु बोर्डे, उद्योजक बाबासाहेब कल्याणी, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजरीव कदम, जयसिंगराव पाटील-उंडाळकर, कृषीतज्ञ सदुभाऊ पाटील यांचा त्यामध्ये समावेश आहे.
15 डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण: माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु यांच्या उपस्थितीत खासदार श्रीनिवास पाटील यांना दि. १५ डिसेंबरला सायंकाळी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ब्रिगेडीयर जेम्स थॉमस आणि साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा देखील या कार्यक्रमात विषेश पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. तसेच वीर माता श्रीमती यशोदाबाई चव्हाण, आदर्श माता बाळुताई ढेबे, आदर्श विद्यार्थिनी अमृता पाटील, आदर्श विद्यार्थी सोहेल मुलाणी यांनाही गौरवण्यात येणार आहे.
गौरव ग्रंथाचे प्रकाशन: विजय दिवस समारोहाचे संकल्पक निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारीत गौरव ग्रंथाचे प्रकाशन माजी गृहमंत्री, आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. कराड तालुक्यातील शेणोली गावचे सुपुत्र असलेल्या संभाजी पाटील यांनी विजय दिवस समारोहाच्या माध्यमातून तरूण पिढीला सैन्य दलात जाऊन देशसेवा करण्याची उर्जा दिली आहे. त्याबद्दल गौरव ग्रंथ काढण्यात आला आहे.