सातारा : जैन साध्वी जयलताश्रीजी यांचे कराड येथील संभवनाथ जैन मंदिरात देहावसान झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी संपुर्ण कुटुंबासह जैन धर्माची दीक्षा घेतली होती. 48 वर्षांच्या दीक्षा जीवनात त्यांनी अनेक जप, तप, साधना केल्या. गुलाल, नाण्यांची उधळण आणि जय जय नंदा, जय जय भद्दाच्या जयघोषात कराड शहरातून त्यांची पालखीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर कोयना नदीकाठी त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे कराड शहरातील सर्व जैन धर्मियांनी बंद पाळला.
साध्वी जयलताश्रींचा मोठा त्याग : जयलताश्री यांनी वयाच्या 48 व्या वर्षी मुंबईमध्ये जैन धर्माची दीक्षा घेतली होती. त्यांच्या सोबत पती आणि दोन मुलींनी देखील दीक्षा घेऊन सुख, सुविधांचा त्याग करत आपले आयुष्य परोपकारात व्यतित करण्याचा निर्णय घेतला. जयलताश्रींनी जप, तप, साधना केली. दीक्षा घेतल्यानंतर सर्वस्वाचा त्याग केला. अनवाणी पायी चालत चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांचे अस्त्वि जैन धर्मियांसाठी आनंद आणि कल्याणकारी होते. कराड येथील संभवनाथ जैन मंदिरात त्यांना देवाज्ञा झाली. साध्वींचा कालधर्म (मृत्यू) ज्याठिकाणी होतो तेथील जैन बांधव ती घटना भाग्याची मानतात.
मोक्षप्राप्ती होणार म्हणून आनंदोत्सव : सुख, सुविधांचा त्याग करत जैन धर्माची दीक्षा घेतल्यानंतर साध्वी जयलताश्री यांनी खडतर जीवन काढले. हालअपेष्टा सहन केल्या. अनवाणी चालत गावोगावी जाऊन चांगल्या गोष्टींचा प्रसार केला. त्यांना देवाज्ञा झाल्यानंतर लवकरच मोक्ष प्राप्त होणार, या भावनेतून जैन बांधवांनी साध्वी जयलताश्रींची कराड शहरातून पालखीतून अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रेत गुलाल आणि नाण्यांची उधळण करण्यात आली. जैन धर्मात तपस्वी साधू आणि साध्वी यांच्या निधनानंतर त्यांना मोक्षप्राप्ती होणार, या भावनेतून त्यांच्या अंत्ययात्रेत आनंदोत्सव साजरा केला जातो, अशी माहिती जैन बांधवांनी दिली.
साधू, साध्वींचे आयुष्य कल्याणकारी : दीक्षा घेणार्या साधू आणि साध्वींचे आयुष्य, अस्तित्व हे जैन बांधव कल्याणकारी मानतात. त्यामुळे अशा साधू, साध्वींच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत पालखीला खांदा देण्यासाठी तसेच अग्निसंस्काराचा मान मिळण्यासाठी लाखो रूपयांची बोली लावतात. त्यातून जमा होणार्या पैशातून जैन समाजाच्यावतीने गोरगरिबांना दानधर्म तसेच गो शाळांना मदत केली जाते. साध्वी जयलताश्री यांच्यावर तूप आणि चंदनाच्या लाकडामध्ये कोयना नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा : रामायणातील चौपाईचा 'असा' करा जप, जाणून घ्या रामचरितमानस महाकाव्याबद्दल