कराड (सातारा) - एखाद्या नेत्याच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे भाजपा उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि रजनी पाटील यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
राज्यसभेची निवडणूक होणार की भाजपा माघार घेणार, ही उत्सुकता असताना भाजपाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार रजनी पाटील यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर रजनी पाटील यांनी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. पृथ्वीराज चव्हाण यांनी रजनी पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन काँग्रेस कडून भाजप नेत्यांना करण्यात आले. त्यानुसार राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होऊन काँग्रेसच्या रजनी पाटील यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाली आहे.
यापुर्वी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रजनी पाटील यांना त्यांच्या जागी राज्यसभेची संधी देण्यात आली होती. त्यावेळी सुध्दा त्यांची बिनविरोध निवड झाली होती. तसेच भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने देखील उमेदवार दिला नव्हता आणि ती निवडणूकही बिनविरोध झाली होती, अशा आठवणींना पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी उजाळा दिला.