सातारा - आगामी विधानसभा निवडणूकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी घेण्यात येणार आहेत. या मुलाखती खुद्द अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.
येत्या काही दिवसात विधानसभेसाठी राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येईल. मात्र, या आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरूवात केली आहे. सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव, फलटण, वाई, माण-खटाव, पाटण या सर्वच्या सर्व विधानसभा मतदार संघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे.
गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव घुले यांच्या उपस्थितीत इच्छुकांची बैठक होणार आहे. त्यामध्ये इच्छुकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. जिल्ह्यातील पक्षाचे आजी-माजी खासदार व आमदार, यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.