सातारा - सातारा जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योगांनी सामाजिक दायित्व निधीचा (CSR) विनियोग करुन कोविड उपचारासाठी दवाखाना उभा करावा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
लाभार्थी कंपन्यांचे बॅलन्सशिट तपासा
यासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील ‘SEZ’आणि ‘D Zone’चा फायदा घेतलेल्या कंपन्यांची बॅलन्सशिट मागवाव्यात, त्या तपासून कायद्याने अनिवार्य असलेलल्या उद्योगांना सामाजिक दायित्व निधी (CSR) चा निधी हा सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी कोविड उपचारासाठी दवाखाना उभा करण्यासाठी खर्च करावा , अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना केल्या.
उपकार नाही तर कर्तव्य
त्या उद्योगांच्या बॅलन्स शिट पुढील बैठकीत बरोबर घेऊन , महाराष्ट्र राज्य औद्योगिक मंडळाचे अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लवकर घेण्यात यावी, अशी सुचनाही खासदार भोसले यांनी केली. तसेच कंपन्या हा खर्च करुन स्थानिक नागरिकांवर उपकार करत नसुन ते त्यांना कायद्याने बंधनकारक आहे.
कंपन्यांना इशारा-
जर या निधीमधुन स्थानिक जनतेसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली नाही, तर कंपन्यांनी शासकीय योजनांचा आतापर्यंत घेतलेला फायदा, याचा हिशोब करुन त्यासंदर्भात वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही उदयनराजे भोसले यांनी बैठकीत दिला.