माझी आई शिक्षिका होती, आपण जो एक रुपया कमावतो त्यातून सरकारला कर रूपाने ३० पैसे द्यावे, स्वतःला ४० पैसे ठेवावे आणि उर्वरीत ३० पैसे समाजासाठी खर्च करावे” अशी शिकवण तिने दिली. हीच शिकवण मी विविध उपक्रमातून आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन युवा उद्योजक, इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केले.
इंद्राणी बालन फाउंडेशन तर्फे सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थांना सायकल आणि स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले, याप्रसंगी बालन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. प्रमुख पाहुणे एम. एस. बिट्टा, आर. एम. जान्हवी आर. धारिवाल, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले उपस्थित होते. तसेच अभिजित घुले, किशोर ढगे, भुजंगराव जाधव, सारंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बालन म्हणाले, इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत अडीच हजाराहून अधिक सायकल, एक हजार संगणक, आठशे स्वयंसिद्धा किटचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक शाळांच्या ग्रंथालयांना पुस्तके देऊन सातारा हा पुस्तकांचा जिल्हा केला आहे. असे कार्य सुरु राहण्यासाठी समाजात अनेक पुनीत बालन निर्माण होण्याची गरज आहे. प्रत्येक पालकाने मुलांना चांगली शिकवण द्यावी, प्रोत्साहन द्यावे कारण आज समाजाला चांगल्या युवकांची, नेतृत्वाची गरज आहे.
फाउंडेशनच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाचा फायदा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना होत असल्याचे सांगताना बालन म्हणाले. या मुलांना ३ ते १० कि.मी. प्रवास करावा लागायचा, त्यांना सायकल मिळाल्याने त्यांच्या वेळेची बचत झाली, विद्यार्थी वाचलेला वेळ अभ्यासाला देत असून जी मुले अभ्यासात सर्वसाधारण होती ती आता पहिल्या तीन मध्ये येत आहेत असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, पुनीत बालन आपल्या आईच्या नावाने फाउंडेशनच्या माध्यमातून करत असलेले सामाजिक कार्य अत्यंत महत्वाचे आहे. दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सायकलच्या रूपाने ते प्रगतीच्या मार्गावर नेत आहेत. जान्हवी धारिवाल या आपले वडील रसिकलाल धारिवाल यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत असल्याचा अभिमान वाटतो असे नमूद करत त्यांच्या आणि धारिवाल यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.
एम. एस. बिट्टा म्हणाले, पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल हे सामाजिक कार्य सेवा म्हणून नव्हे तर आपले कर्तव्य आहे या जाणीवेतून करत आहेत. विद्यार्थ्यांना संगणक आणि सायकल देऊन ते सक्षम भारत घडवत आहेत.
जान्हवी आर. धारिवाल म्हणाल्या, जगात गरीब श्रीमंत असे कुणी नसते फक्त प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि प्रयत्न केल्यास मनुष्य आपली परिस्थिती बदलू शकतो. मुलांनी भविष्यात खूप प्रगती करावी आणि आपल्याला मोठे करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आई वडिलांच्या कार्याची जाणीव ठेवावी व त्यांना कधीही अंतर देऊ नये असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
या प्रसंगी बालग्रामच्या संतोष आणि प्रीती गर्जे यांना ‘परिवर्तन युवा पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर धावडे यांनी केले, सूत्रसंचालन सचिन जगताप यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुनील मते यांनी केले.