सातारा- अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले 'निसर्ग' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यामध्ये काही भागांत अतिवृष्टी व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील नियंत्रण कक्षातून निसर्ग वादळाविषयी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 120 किमी असू शकतो. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील विशेषत: महाबळेश्वर, जावळी, वाई, पाटण या तालुक्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी कच्चे घर असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आवश्यक साहित्य व पशूधनासह स्थलांतरित व्हावे. विजेचे खांब, तारा व झाडे यापासून दूर रहावे, असेही जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे.