सातारा: कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विषयावर मला वेदना होतात. गेल्या साठ वर्षापासून कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटलेला नाही. धरणग्रस्तांचा त्याग मोठा आहे. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवू शकलो नाही तर पदावर राहण्यात अर्थ नाही. सरकारने प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा महाराष्ट्रभर जाणारी कोयनेची वीज बंद करू, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला दिला आहे.
उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर: श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयनानगर (ता. पाटण) येथे सुरू असलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. त्यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करणार आहेच. तथापि, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत. यासंदर्भात मी प्रकल्पग्रस्तांसोबत आहे. प्रश्न न सोडविल्यास कोणत्याही परिस्थितीत कोयनेची वीज बाहेर जाऊ देणार नाही. यासंदर्भात मी सरकारला अल्टीमेटम देणार आहे, असा घरचा आहेर उदयनराजेंनी दिला.
तर पदावर राहण्यात काय अर्थ? लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रश्न सोडवू शकलो नाही तर त्या पदावर राहण्यात काय अर्थ, असा सवाल उदयनराजेंनी केला. माझी बांधिलकी तत्त्वांशी आहे, प्रकल्पग्रस्तांशी आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वाटेला त्या परिस्थितीत कोयनेची वीज बाहेर जाऊ देणार नाही. वीज बंद केली की महाराष्ट्रातील सगळे जण कोयनेत येतील, असे उदयनराजे म्हणाले.
धरणग्रस्तांचा त्याग: धरणांच्या उभारणीत धरणग्रस्तांचा त्याग मोठा आहे. त्यांचे प्रश्न साठ वर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे मनाला वेदना होतात, असे सांगून उदयनराजे म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी मी स्वत: चर्चा करणार आहे. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी हा प्रश्न अनेकदा मांडला आहे. आंदोलने केली आहेत. मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना एक कल्पना सुचली की पाणी अडवले तर लोकांचे भले होईल, आज जेवढी धरणे झाली, त्यामध्ये या धरणग्रस्तांचा मोठा त्याग आहे. त्यामुळे अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी त्यांनी केली.
अधिकार्यांना देणे-घेणे नाही: कोयना प्रकल्पग्रस्तांना प्रत्येक वेळी आश्वासनेच देण्यात आली आहेत. एवढी वर्षे पुर्नवसनला लागलीच का, असा सवाल करून उदयनराजे म्हणाले, कोयना खोर्यातील लोक भोळी-भाबडी आहेत. साठ वर्षे होऊन गेली तरी हे लोक आंदोलने, मोर्चे काढत आहेत. अधिकार्यांना या लोकांच्या प्रश्नाशी काहीही देणे-घेणे नाही. सध्या अधिवेशन सुरू असून मी निश्चितपणे शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
कोयना वीज प्रकल्पाला मदतीचे आश्वासन: आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास 10 डिसेंबर, 2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना विद्युत प्रकल्प टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केला होता. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब, मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री (गृह) शंभूराजे देसाई, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोंकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.