सातारा - महाबळेश्वर येथील ड्रीमलँड हॉटेल व्यवस्थापनाला आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय साथरोग अधिनियमांतर्गत स्थानिक प्रशासनाने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. चार दिवसात दुसऱयांदा हा गुन्हा केल्याने हा दंड लावण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या दंड लावण्यात आल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
मालकासह आयोजकांनाही दंड -
पर्यटकांचे माहेरघर असलेल्या महाबळेश्वरात मध्येमनिष तेजानी यांचे ड्रीमलँड हॉटेल आहे. काल या ठिकाणी एका लग्मसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभ सुरू असताना पोलीस, महसूल प्रशासन आणि नगर पालिकेच्या कर्मचाऱयांचे एक पथक तेथे पोहचले. 50 लोकांच्या मर्यादेत जिल्हाधिकाऱयांनी लग्नसमारंभाला परवानगी दिली असताना या ठिकाणी 50 पेक्षा अधिक लोक होते. तसेच सामाजिक अंतराचे भान पाळले जात नव्हते. त्यामुळे कोविडकाळात नियमांचा भंग केल्याप्रकरणी हॉटेल मालकावर एक लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय लग्न संयोजकांकडून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई -
चारच दिवसांपूर्वी हॉटेल ड्रीमलँडमध्ये याच पध्दतीने कोरोना व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन करण्यात आल्याचं निदर्शनास आले होते. त्या लग्नसमारंभात पन्नास पेक्षा अधिक लोकांची गर्दी जमली होती. महाबळेश्वरच्या पथकाने हॉटेल व्यवस्थापनाला 25 हजार रुपये दंड तसेच लग्न संयोजकांना दहा हजार रुपये दंड केला होता. चारच दिवसांत याच हॉटेलवर ही दुसरी कारवाई करण्यात आल्यानं तब्बल एक लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.
साताऱ्यातही 35 हजार दंड वसूल -
साताऱ्यात सदरबझारमध्ये सारंग मंगल कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून विवाह सोहळ्यास 100 ते 150 लोकांना एकत्र आणल्याच्या कारणावरून कार्यालय मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई केली. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. मंगल कार्यालय मालक बबलू सोळंकी (रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार) याला 25 हजार रुपयांचा तर विवाह आयोजकांना 10 हजार रुपये असा एकूण 35 हजार रुपयांचा दंड जागेवरच वसूल केला.\