सातारा : बजरंग काटकर हे पत्नीसोबत दुचाकीवरून कोरेगावला येत होते. ऊस वाहतूक करणारी ट्रॉली कुमठे फाट्याच्या दिशेने निघाली होती. ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत निघालेल्या भरधाव मालट्रकने काटकर दाम्पत्याच्या दुचाकीला समोरून भीषण धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीला सुमारे वीस-पंचवीस फूट फरफटत नेले. त्यात काटकर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
ट्रक चालकाचे पलायन : अपघाताची माहिती मिळताच कोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी काटकर दाम्पत्याचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेले. अपघातानंतर मालट्रकचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. ग्रामीण रुगणालयात काटकर दाम्पत्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त मालट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात लावला आहे. या अपघाताची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात आली आहे.
पिशवीतील भगवतगिता पाहून हळहळ : काटकर दाम्पत्याच्या दुचाकीला एक पिशवी अडकविलेली होती. त्या पिशवीमध्ये भगवद्गीता होती. मालट्रकने दुचाकीला धडक देऊन फरफटत नेल्यानंतर गाडीची पिशवी रस्त्याच्या कडेला पडली होती. अपघातानंतर पिशवी उघडून पाहिली असता पिशवीत भगवत गिता आढळली. त्यामुळे उपस्थित हळहळले.
खासगी बसने उडविले : पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरवळ येथील पुणे थांब्यावर वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना पुण्याकडे भरधाव निघालेल्या खासगी बसने जुलै, 2022 मध्ये उडविले. या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शिरवळ तसेच पुणे येथे उपचार सुरू करण्यात आले होते. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला होते. महामार्गावरील पांढऱ्या पट्ट्यांना गतिरोधक समजून खासगी बस चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस महामार्गावर आडवी झाली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेले प्रवाशी यात सापडले. या घटनेत मयूर रवींद्र रावे (या. हिंजवडी, पुणे), रणजित कुंभार (रा. पुणे), निकिता दत्तात्रय जाधव (२३, रा. अतिट, ता. खंडाळा) व सुंदर सुरेश मोदी (२८, रा. शिरवळ, ता. खंडाळा) हे गंभीर जखमी झाले होते.
हेही वाचा : Bageshwar Dham Row : भोंदू बागेश्वरधाम 'शिंदेशाही पगडी' काढा...; संभाजी ब्रिगेड आक्रमक