सातारा - संचारबंदी शिथीलतेने पाटण तालुक्यात खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली. पाटण शहरात तर आता दररोजच आठवडी बाजार भरू लागला आहे. या गर्दीचा फायदा घेत हातावर होमक्वारंटाईनचे शिक्के मारलेले अनेक लोक बाजारात खुलेआम फिरताना दिसत आहेत. या प्रकारामुळे कोरोना संसर्गाचा फैलाव होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
पाटण तालुक्यातंर्गत अनेक लोक आपापल्या मूळ गावात परतत आहेत. त्यांना होम क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय अन्य राज्य, जिल्हे व सातारा जिल्हा व अन्य तालुक्यातून या तालुक्यात येताना संबंधितांची आरोग्य तपासणी व अधिकृत परवाने असल्याशिवाय त्यांना या तालुक्यात प्रवेश दिला जात नाही.
तालुक्यात येणारांनी आपली माहिती स्थानिक प्रशासनाला देवून त्याची अधिकृत नोंद व हातावर शिक्का मारून होम क्वारंटाइन होणे त्यांच्यावर बंधनकारक करण्यात आले आहे. इतर राज्य, जिल्हे व तालुके या ठिकाणांहून पाटण तालुक्यात येणाऱ्यांची संख्या काही हजारात असून चोरीछुपे येणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. असे असताना कोणी बेकायदेशीरपणे तालुक्यात आला, तर संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
सध्या संचारबंदी शिथिलतेमुळे पाटणसह तालुक्यातील बहुतांशी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीत ज्या लोकांच्या हातावर होमक्वारंटाईनचे शिक्के आहेत, असे लोकही बिनधास्तपणे फिरत आहेत. त्यांच्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. अशावेळी एक रुग्ण जरी सापडला, तरी बधितांची भलीमोठी साखळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे दीड महिना पाळलेले निर्बंध व घेतलेली खबरदारी यावर पाणी पडण्याची भीतीही निर्माण झाली आहे.