सातारा (खटाव) - शिवसेनेचे धारावी मतदारसंघातील माजी आमदार बाबुराव माने यांना त्यांच्या नेर ता. खटाव गावात जातीवाचक शिवीगाळ करत तीन जणांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यात घडली. या प्रकरणात खटाव तालुक्यातील पुसेगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दत्ता बनकर, हनुमंत दत्ता बनकर, गणेश दत्ता बनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेर- खटाव या गावात ही घटना घडली होती. या तिघांनी जातीवरून शिव्या देत मारहाण केली होती. मात्र, ही घटना 27 जून रोजी घडली होती तर गुन्हा 6 जुलै रोजी नोंदवण्यात आला आहे. या प्रकाराने आपली गावात मानहानी आणि नाचक्की झाली, असे माने यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे. तर त्या तिघांवरही अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासाहित आयपीसीच्या कलम ३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.