सातारा - डेरवण ता. पाटण येथील एका दहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानंतर परिसरातील काही लोकांना कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे क्वारंटाइन करून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी हाय रिस्कमधील ज्यांचे नमुने निगेटिव्ह आले, त्यांना आता पाटण येथील समाजकल्याण विभागाच्या नूतन वसतिगृहातील कोरोना केअर सेंटरच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
सध्या यापैकी 16 जणांना येथे ठेवण्यात आले असून उर्वरित पाच जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून तेही निगेटिव्ह आले तर त्यानांही पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये आणण्यात येणार आहे. तथापी ज्या लो रिस्क मधील लोकांना कृष्णा हॉस्पीटल येथे ठेवण्यात आले होते. त्यापैकी ज्यांचे नमुने निगेटिव्ह आले अशा चाफळ येथील खासगी डॉक्टरसह अन्य तेरा जणांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले आहेत. त्यांना त्यांच्या गावात होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या दहा महिन्याच्या बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची आई व चुलती या दोघींचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याशिवाय त्या चुलतीच्या दोन लहान मुलांचे अहवाल प्रलंबित असल्याने त्या चुलतीसह मुलांना अद्यापही कृष्णा हॉस्पीटल कराड येथेच ठेवण्यात आले आहे. जर या दोन्ही बालकांचे अहवाल निगेटिव्ह आले तर त्या दोन्ही बालकांसह त्यांच्या आईलाही पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये आणण्यात येणार आहे. यापूर्वी मुंबई येथे एस. टी. सेवा बजावून आलेले चार कर्मचारी व अन्य एक जण अशा एकूण पाच व्यक्तींना येथील मिलिट्री वसतीगृहात क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली.