सातारा - दोन तासांच्या चार्जिंगमध्ये 25 ते 30 किलोमीटर मायलेज देणारी सायकल सध्या सातारकरांच्या आकर्षणाचा विषय बनली आहे. हिरो कंपनीने बाजारात आणलेली 'हिरो लेक्ट्रो' ही सायकल बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी कोल्हापूर येथील डिलरकडून नुकतीच खरेदी केली आहे. साधारण 21 हजार रुपये किंमतीची ही सायकल पॅडलिंगद्वारे किंवा इलेक्ट्रिकद्वारे चालवता येते. तसेच दोन तासात रिचार्जही होते. वापरण्यास अत्यंत साधी, सुटसुटीत असलेली ही सायकल सातारकरांच्या कुतूहलाचा विषय ठरली आहे.
हेही वाचा - 'शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही'
इंधन बचतीची सुरुवात स्वत:पासून : चोरगे
या सायकलच्या वापराबाबत बोलताना राजेंद्र चोरगे यांनी सांगितले की, आठवड्यातून एक पूर्ण दिवस मी या सायकलचा वापर करणार आहे. इतर दिवशी 'गुरुकूल स्कूल' या माझ्या शाळेतील स्टाफ त्यांच्या नित्याच्या, बाहेरील कामांसाठी ही सायकल वापरली जाईल, जेणेकरून इंधनबचतीची सुरुवात स्वत:पासून होईल.
चार्जिंग स्टेशनची गरज नाही -
ही सायकल रोजच्या 'प्लग पॉइंट'ने चार्ज करता येते. तिच्यासाठी चार्जिंग स्टेशनची गरज नाही. त्यामुळे ही सायकल सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. 30 किलोमीटर प्रतितास या वेगाने ती धावू शकते. लो, मिडीयम आणि हाय अशा तीन गिअरमध्ये ती धावते.
हेही वाचा - कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांचे नांदेडमध्ये जंगी स्वागत...
12 ते 16 पैसे प्रती किमी
या सायकलचा प्रवास किफायतशीर असल्याचे राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, एका रिचार्जमध्ये 25 ते 30 किलोमीटर सायकल धावते. बॅटरी एकवेळ चार्ज करायला अर्धा युनिट वीज लागते. विजेचा 100 ते 500 युनिट वापराचा दर 7 ते 10 रुपये प्रति युनिट आहे. म्हणजे साडेतीन ते पाच रुपयात 30 किलोमीटर या सरासरीने अवघे 12 ते 16 पैसे प्रति किलोमीटर इतका खर्च पडतो. त्यामुळेच या सायकलचा प्रवास प्रदूषणमुक्त व किफायतशीर आहे.
बॅटरीशिवाय या सायकलच्या पॅडलचाही वापर करता येत असल्याने उताराला तसेच सपाटीला बॅटरीची उर्जा वाचवता येते. साताऱ्यासारख्या चढ-उताराच्या शहरात साधी सायकल पॅडलद्वारे चालवणे जिकरीचे जाते. अशा ठिकाणी ही बॅटरीवरील सायकल उपयुक्त ठरणार आहे.