सातारा - महाबळेश्वरसह जिल्ह्याच्या काही भागात, काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेण्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने, महाबळेश्वर-पाचगणी रस्ता काही काळ बंद करण्यात आला होता. दरम्यान, महाबळेश्वरसह वाई, सातारा, जावळी या भागात पावसाचा जोर पहायला मिळाला.
मुसळधार पाऊसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम
महाबळेश्वर व परिसरात पावसाची संततधार सुरूच असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु झालेल्या पावसाची संततधार सुरूच आहे. कालपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. या पावसामुळे महाबळेश्वर- पांचगणी मुख्य रस्ता हा वेण्णालेक नजीक पाण्याखाली गेल्याने, वाहतूक काहीकाळ मंदावली होती. या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत होती.
पाचगणी- वाई -साताऱ्यातही पाऊस
संततधार पावसाने महाबळेश्वरचा निसर्ग बहरला असून, पावसाळी हंगामास बहर आला आहे. येथे आलेले पर्यटक या पावसात मनमुराद भिजण्याचा आनंद लुटत आहेत. महाबळेश्वरसह पाचगणी, वाई, सातारा, जावली परिसरातही आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ओढे-नाले भरून वाहत आहेत. मोठ्या पावसामुळे रस्त्यावर ही अनेक ठिकाणी पाणी साठवून राहिले होते.
जिल्ह्यात सरासरी १९.८ मि.मी. पाऊस
पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक संथ सुरु आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साठवून राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १९.८ मि.मी. पाऊस झाला. आतापर्यंत सरासरी ११९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये सातारा- २३.३ मि. मी., जावळी- ४७, पाटण-३५ , कराड-१४(७५), वाई-१८.३ तर, महाबळेश्वर-८५.६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली.