कराड (सातारा) - सातारा जिल्ह्यात मंगळवारपासून ते बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ५१०.५० मि. मी. पावसाची नोंद झाली. पावसाची सरासरी ५.६१ इतकी असून जिल्ह्यात सर्वाधिक १६१ मि. मी. पावसाची नोंद पाटण तालुक्यात झाली आहे.
बंगालच्या उपसगरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :
सातारा-१०५.६० मि. मी., जावली-२९.२० मि. मी., पाटण-१६१.०० मि. मी., कराड-९५.०० मि. मी., कोरेगाव-३३.०० मि. मी., खटाव-३०.७० मि. मी., माण-६.०० मि. मी., फलटण-१२.०० मि. मी., खंडाळा-९.४० मि. मी., वाई-६.०० मि. मी., महाबळेश्वर-२२.६० मि. मी.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापन सतर्क झाले असून पाणी पातळी नियंत्रित करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या कोयना धरणाचे दरवाजे बंद असून केवळ पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू आहे. कोयना धरणात सध्या १०४.२८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तसेच धरणात प्रति सेकंद २१०० क्युसेक पाण्याची आवक होत असून पायथा वीजगृहातून तितक्याच (२१०० क्युसेक) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. मंगळवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास धरणाचे चार वक्र दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले होते. बुधवारी सकाळी चारही दरवाजे बंद करून केवळ पायथा वीजगृहातील विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.