सातारा- जिल्ह्यात दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची टंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्यासाठी लोक चारा छावण्यावर अवलंबून असून पाण्याच्या टँकरद्वारे ते आपली तहान भागवत आहे. या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील लोकांचे हाल झाले. मात्र बुधवारी दुपारपासून रात्री एक ते दोन वाजेपर्यंत दमदार पाऊस पडला. त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे.
दुष्काळी माण खटाव यंदाही चारा, पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. आज पाऊस येईल, उद्या येईल या आशेवर असलेल्या माणदेशातील लोकांना पावसाने सतत हुलकावणीच दिली. गणपती बाप्पा तरी पावेल ही अपेक्षा देखील फोल ठरली. पूर्ण गणेशोत्सव कोरडा गेल्याने दुष्काळाचे ढग गडद होवू लागले होते. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती.
मात्र काल दुपारी साधारण चारच्या सुमारास माणच्या पुर्वेकडे म्हसवडसह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर हा पाऊस गोंदवले, दहिवडी, मलवडी असा पश्चिमेकडे सरकला. तर खटावमध्ये देखील वडूज, डिस्कळ, नढवळ, खटाव, निढळ या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी साधारण दोन तास तर काही ठिकाणी रात्रभर हलक्या सरी थांबून, थांबून जोरदार कोसळल्या.
हेही वाचा- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ४० जागाही निवडूण येणार नाहीत - गिरीश महाजन
त्याचबरोबर, फलटण शहरात व आजू बाजूला देखील सायंकाळी जोरदार पाऊस पडला आहे. तरडगाव, मोराळे, काळज, साखरवाडी या ठिकाणी देखील पावसाने चांगली हजेरी लावली आहे. कोरेगाव तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता तर सायंकाळी चारच्या सुमारास अचानकपणे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला आहे. झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना व माणवासियांना दिलासा मिळाला आहे.