सातारा - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरला असुन धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. धरण परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु असल्याने चोवीस तासात कोयना धरणातील पाणीसाठयात तब्बल 6.13 टीएमसी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणात एकूण 60.67 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. त्यामुळे शिवाजीसागर जलाशयातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नवजा येथे सर्वात जास्त म्हणजे 271 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात पाण्याची आवक 19369 क्युसेक्स प्रती सेकंद होत असल्याने धरणातील पाण्याची पातळी 2117.01 फुट तर पाणी साठा 60.67 टीएमसी झाला आहे.
शनिवार सकाळी 8 वाजेपर्यंत कोयनानगर येथे 237 (2571), मिलीमीटर तर नवजात सर्वात जास्त म्हणजे 271 (2994), महाबळेश्वर येथे 204 (2523) मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा 60.67 टीएमसी झाला आहे. गतवर्षी याच तारखेला धरणात 84.47 टीएमसी पाणीसाठा होता. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमतेचे कोयना धरण सध्या अर्धे भरले आहे.