कराड (सातारा)- कराड शहरामध्ये शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गँगवॉरचा भडका उडाला. गुन्हेगारी वर्तुळातील दोन गटात तुफान राडा झाला. पिस्तुलचा धाक दाखवून दमदाटी करण्यात आली. युवकांनी दगडफेक करत एका दुचाकीची जाळपोळ केली. तसेच यावेळी झालेल्या दगडफेकीत एकजण जखमी झाला असून अग्निशमन दलाच्या गाडीच्याही काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादींवरून 21 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा... चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला; हल्ल्यात पत्नी अन् सासू गंभीर जखमी
कराडमधील बुधवार पेठ आणि प्रभात टॉकीज परिसरात शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे कराड शहरात रविवारी दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. गणेश वायदंडे (रा. बुधवार पेठ, कराड) याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अमीर फारुक शेख (32, रा. शिवाजीनगर, मलकापूर, ता. कराड) याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी शनिवारी रात्रीपासून चोख बंदोबस्त तैनात आहे. घटनास्थळी मोठा जमाव होता. त्या जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. प्रभात टॉकीज व बुधवार पेठ परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.