कराड (सातारा) - कोयना धरणाचे दरवाजे आज सकाळी १२ फुटांवरून १० फूट करण्यात आले आहेत. धरणातून कोयना नदी पात्रात होणारा विसर्ग आणि पावसाचा जोर देखील कमी झाला आहे. यामुळे कोयना आणि कृष्णाकठाला तूर्तास दिलासा मिळाला आहे. कराड तसेच तांबवे (ता. कराड) येथील पूरदेखील ओसरू लागला आहे. कराडमध्ये रात्रभर पावसाने विश्रांती घेतली. तसेच तीन दिवसानंतर कराडकरांना आज सूर्यदर्शन झाले.
आज अलमट्टी धरणातून ३,५०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यास कराड आणि सांगली शहराला मोठा दिलासा मिळेल.
कोयना धरणात 87 टीएमसी पाणीसाठा...
कोयना धरणात शनिवारी सकाळी ८ वाजता 87.15 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणी पातळी 655.66 मीटर इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोयना धरणात प्रति सेकंद सरासरी 1,19,726 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे आणि पायथा वीजगृहातून एकूण 48,576 क्युसेक प्रति सेकंद विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 204 मिलिमीटर, नवजा येथे 207 मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे 287 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणाचे दरवाजे १२ फुटांवरून १० फुटांवर आणण्यात आले आहेत. परिणामी कोयना आणि कृष्णा नदीकाठाला मोठा दिलासा मिळाला आहे.