कराड (सातारा) - पाण्याची मोटर बंद करण्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना पाचवड फाटा (ता. कराड) येथे घडली. रवी यादव अशोक यादव (रा. उत्तर प्रदेश), असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामू उर्फ रामप्रसाद परमेश्वर गोस्वामी (रा. उत्तर प्रदेश) यास अटक केली आहे.
राहूल मोहन यादव (रा. कालेटेक, ता. कराड) यांच्या गॅरेजवर रवी यादव हा कामगार होता. राहूल यादव हे गॅरेज बंद करून घरी जात असताना रात्री नऊच्या सुमारास रवी यादव आणि रामप्रसाद गोस्वामी यांच्यात पाण्याची मोटर बंद करण्यावरून वाद झाला. या वादात रामप्रसाद गोस्वामी याने रवी यादव याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. त्यात तो जबर जखमी झाला. त्याच्या कानातून रक्तस्त्राव झाला. त्यामुळे जखमी अवस्थेत रवी यादव याला कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना तेथे एक लाकडी दांडके मिळून आले. तसेच घटनास्थळी रक्त सांडल्याचेही दिसले. पोलिसांनी पंचनामा करून गॅरेज मालक राहूल मोहन यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामप्रसाद गोस्वामी यास अटक केली आहे.