सातारा - आशियाई महामार्ग क्रमांक ४७ वरील शिरवळ व भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला शिरवळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरून अटक केली आहे. यावेळी या टोळीकडून दोन लाख 83 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. रॉनी जोसफ फर्नांडिस उर्फ साहिल सलीम खान (32), रा मालाड वेस्ट मुंबई, अब्दुल हमीद शेख (33), अब्दुल्ला जमीर उल्ला पठाण (37), सुजित भगवान कांबळे (28) तिघेही रा. मानखुर्द, मुंबई असे अटक करण्यात आलेल्या अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
गोव्यापर्यंत संशयितांचा माग -
शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 जानेवारी रोजी आशियाई महामार्ग क्रमांक ४७ लगत अशोक उत्तमराव गाजरे यांच्या घरातून चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिने असा एकूण चार लाख 28 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या घटनेची तक्रार अशोक गाजरे यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली होती. गाजरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिरवळ गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांनी मुंबई, गुजरातमध्ये जाऊन कौशल्य पणाला लावत चोरट्यांचा माग काढला. तसेच यावेळी विविध ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
गुन्ह्यांची दिली कबुली -
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सलग तीन दिवस, तीन रात्री सापळा रचून घरफोडी करणाऱ्या टोळीतील रॉनी जोसफ फर्नांडिस उर्फ साहिल सलीम खान (32), रा मालाड वेस्ट मुंबई, अब्दुल हमीद शेख (33), अब्दुल्ला जमीर उल्ला पठाण (37), सुजित भगवान कांबळे (28) तिघेही रा. मानखुर्द, मुंबई या अट्टल चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता. त्यांनी शिरवळ व भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गुन्हे केल्याचे कबूल केले. या चोरट्यांकडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, घरफोडी करण्याकरिता वापरलेली कटावणी व एक मोटार कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर या घरफोडी प्रकरणांमध्ये सराईत गुन्हेगार व मुख्य आरोपी संजय रत्नेश कांबळे उर्फ सलीम कुबड्या उर्फ अब्दुल लतीफ शेख (रा.दिवा, ठाणे) याचे नाव निष्पन्न झाले असून त्याचा शोध शिरवळ पोलीस घेत आहे. त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.