सातारा - जिल्ह्यातील कोयनेसह कण्हेर, धोम आणि एरमोडी अशा चार धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी सायंकाळी कोयना, कण्हेर, धोम आणि उरमोडी या चारही धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने कोयनेचे सहा दरवाजे 1 फुटाने उचलण्यात आले आहेत. दरवाजे आणि पायथा वीजगृहातून 11,397 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. याशिवाय कण्हेर धरणाचे दोन दरवाजे आणि वीजगृहातून 1750 क्युसेक, धोम धरणाच्या वीजगृहातून 400 क्युसेक आणि उरमोडीच्या सांडव्यासह वीजगृहातून 1900 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच विजापूर भागात सध्या असणारे वादळ जत-विटा हा पट्टा पार करत गुरूवारी सकाळी 10 वाजेपर्यंत कराड भागात पोहचण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या पुर्वेकडील पट्ट्यात बुधवारी रात्रीपासून गुरूवारी सकाळपर्यंत वार्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. बुधवारी दुपारपासून सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सायंकाळी चार धरणांचे दरवाजे उघडून तसेच पायथा वीजगृह कार्यान्वित करून नदीपात्रात विसर्ग करावा लागला आहे.
कोयना धरणात बुधवारी रात्री 10 वाजता 104.38 टीएमसी पाणीसाठा होता. धरणात प्रतिसेकंद 11,397 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाचे सहा दरवाजे 1 फुटांवर स्थिर ठेऊन 9,297 क्युसेक आणि पायथा वीजगृहातून 2100, असा एकूण 11,397 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.
कन्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर असून धरणाचे वीजगृह कार्यान्वित केले आहे. या धरणातून 550 क्युसेक दोन वक्र दरवाजांतून 1200 क्युसेक असा एकूण 1750 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धोम धरणाचेही वीजगृह कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामधून 400 क्युसेक विसर्ग नदीपात्रात होत आहे, तर उरमोडी धरणाचे दोन दरवाजे आणि वीजगृहातून 1900 क्युसेक पाण्याचा विसर्ग उरमोडी नदी पात्रात सुरू आहे. यामुळे कोयना, कृष्णा, वेण्णा आणि उरमोडी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.