पाटण(सातारा)- पाटण तालुक्यात शनिवारी रात्री चार जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 94 वर गेली आहे. शनिवारी रात्री उशिरा शितपवाडी येथील तीन व नवसरी येथील एक अशा चार जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. 94 बाधितांपैकी 61 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत तीन महिला व दोन पुरूष अशा पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या 28 बाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.
शनिवारी रात्री उशिरा शितपवाडी येथील 60 व 28 वर्षे महिला, 31 वर्षे पुरुष व नवसरी येथील एका 42 वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर नवसरी येथील रुग्णाला कृष्णा हाॅस्पिटल कराड व शितपवाडी येथील तिघांना सह्याद्री हाॅस्पिटल, कराड येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अॅक्टिव्ह असणाऱ्या 28 रुग्णांपैकी 23 रुग्णांवर कृष्णा हाॅस्पिटल कराड, 3 रुग्णांवर सह्याद्री हाॅस्पिटल, कराड आणि दोघांवर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील कुटुंबिय व नातेवाईक आदी हाय रिस्कमधील 93 व्यक्तींना पाटण येथील कोरोना केअर सेंटर, प्रियदर्शनी महिला वसतिगृह, मिल्ट्री बाॅइज होस्टेल व तळमावले कोरोना केअर सेंटर आदी ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. रविवारी नव्याने कोणाचेही स्वॅब नमुने घेण्यात आलेले नाहीत. आज काही व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचेही श्रीरंग तांबे व डाॅ.आर. बी. पाटील यांनी सांगितले.
आतापर्यंत एकूण 61 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून त्यापैकी 60 व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे. एका व्यक्तीला होम क्वारंटाइनची सुविधा उपलब्ध नसल्याने पाटण येथील बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.