कराड (सातारा) - काँक्रीट मिक्सर प्लॅन्टवरील खोलीचे कुलूप तोडून डिझेल, दोन ब्रेकर, इलेक्ट्रीक मोटर, गॅसची टाकी, गॅस शेगडी, घरगुती मिक्सर आणि लोखंडी पाने चोरून नेल्याप्रकरणी रेकॉर्डवरील चार सराईत चोरट्यांना कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. अमित हणमंत कदम (रा. अंतवडी, ता. कराड), मनोहर उर्फ सोन्या मुरलीधर जाधव (रा. सैदापूर, ता. कराड), विशाल सुनील पिसाळ, अजिंक्य बबन उगले (रा. करवडी, ता. कराड), अशी या चोरांची नावे आहेत.
सुनील दाजी पाटील (रा वारूंजी, ता. कराड) यांचा वाघेरी (ता. कराड) येथील चिंचमळा नावाच्या शिवारातील अल्ट्रॉकन सोल्युशन्स कॉन्क्रीट मिक्सर प्लॅन्ट आहे. या प्लॅन्टवरील खोलीचे कुलूप तोडून डिसेंबर महिन्यात अज्ञात चोरट्यांनी 100 लिटर डिझेलसह दोन ब्रेकर, इलेक्ट्रीक मोटर, लोखडी पाने, गॅसची टाकी, गॅस शेगडी, घरगुती मिक्सर, असा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या चौघांकडून दोन ब्रेकर, शंभर लिटर डिझेल, गॅस शेगडी, घरगुती मिक्सर आणि मोटरसायकल, असा एकूण पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक शशिकांत काळे, सज्जन जगताप, अमित पवार, उत्तम कोळी, कॉ. शशिकांत घाडगे, अमोल हसबे यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा - फ्लिपकार्ट म्हणतंय कसं काय?...मराठी भाषेचा केला समावेश