सातारा - येथे बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाने चार जणांना अटक केली. चौघेही स्थानिक असून त्यांच्याकडून बिबट्याच्या १८ नख्या व पुरुन ठेवलेले बिबट्याचे अवशेष ताब्यात घेतले. संभाजी सदाशिव जंगम, बापू रखमाजी जंगम, पांडुरंग कृष्णा जंगम व शिवाजी धोंडीराम जंगम (सर्व रा. घोणसपूर ता. महाबळेश्वर) अशी संशयितांची नावे आहेत.
सातारा वन विभागाचे सहायक उपवनसंरक्षक व्ही. बी. भडाळी यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की "घोणसपूर येथे बिबट्याची शिकार झाली असल्याची माहिती महाबळेश्वरचे प्रभारी वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांना मिळाली होती. त्या आधारे तपासाला सुरुवात केली. एकएका संशयिताला ताब्यात घेत परिस्थितीजन्य पुराव्यांचीसाखळी जोडत महेश झांजुर्णे व त्यांचे तपास पथक संशयितांपर्यंत पोचले. या संशयितांनी बिबट्याची शिकार केल्याचे कबूल केले. कोयत्याच्या साह्याने बिबट्याच्या नख्या कापल्याचे कबूल केले. बिबट्याच्या एकूण 18 नक्शा त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या.
संशयितांनी वन अधिकाऱ्यांना दिलेल्या कबुली नुसार 13 जानेवारीला बापू जंगम यांची गाय बिबट्याने हल्ला करून मारली होती. त्यामुळे चिडून या चौघांनी गाईच्या शरिरात विषारी औषध पेरले. बिबट्याने मृत गायीचे मांस खाल्ले आणि जागेवरच प्राण सोडला. नंतर या चौघांनी कोयत्याने नख्या कापून घेऊन त्याचा मृतदेह जवळच्या शेतात पुरला. वनाधिकार्यांनी बिबट्याचे अवशेष ताब्यात घेतले आहेत.
बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी चारही संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची पाच दिवसांसाठी वन कोठडीत रवानगी करण्यात आली. या गुन्ह्यांत आणखी इतर कोणाचा सहभाग आहे का? या आरोपींनी अन्य वन्य प्राण्यांची शिकार केली आहे का? याबाबतचा तपास महेश झांजुर्णे करत आहेत. आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1972 चे 9/39,48,50,51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, सहाय्यक उपवनसंरक्षक व्ही. बी. भडाळे, वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे, वनपाल एस. एम. शिंदे, एस. के. नाईक, वनरक्षक ज्योती घागरे, दीपक सोरट आशिष पाटील, रोहित लोहार, लघु राऊत, सहदेव भिसे, विश्वंभर माळझरकर, मुकेश राउळकर, माधव तोटेवाड, आकाश कुंभार, विद्या घागरे, वनपाल एस. के. शिंदे, नासिर झुंदरे, संतोष काळे, दत्ता डावले यांनी यशस्वी केली.