सातारा - कराडचे प्रवेशद्वार असलेला कोल्हापूर नाका अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरूवारी नाक्यावरील अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी केली. यावेळी नवीन उड्डाणपुलाचा प्रस्ताव आठवड्यात सादर करण्याची सूचनाही उदयनराजेंनी महामार्ग विभागाच्या अधिकार्यांना केली.
कोल्हापूर नाक्यावरून पुण्याकडे जाणार्या लेनवर उड्डाण पूल नाही. या ठिकाणी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत वाहतुकीची कोंडी असते. त्यामुळे वारंवार अपघातही होतात. मागील आठवड्यात सोळा चाकांच्या कंटेनरने मोटरसायकलला धडक दिल्याने लहान मुलगी जागीच ठार झाली होती. त्यामुळे कराड नगरपालिकेतील जनशक्ती-यशवंत विकास आघाडीचे नेते, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांच्या विनंतीवरून माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी कोल्हापूर नाक्यावरील अपघात प्रवण क्षेत्राची पाहणी केली.
हेही वाचा - भाजप जिल्हाध्यक्षाच्या 'त्या' वक्तव्याबद्दल उदयनराजेंनी मागितली मुस्लीम बांधवांची माफी
यावेळी कराड नगरपालिकेतील जनशक्ती-यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक बाळासाहेब यादव, स्मिता हुलवान, सुप्रिया खराडे, अर्चना ढेकळे, किरण पाटील, सुनील काटकर यांच्यासह महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिकरी उपस्थित होते.