कराड (सातारा) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सातारा जिल्हा काँग्रेसचे दीर्घकाळ अध्यक्षपद भूषविलेले विधान परिषदेचे माजी आमदार आनंदराव पाटील हे आपल्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करणार आहेत. तसेच ते लवकरच आपली राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याने त्यांच्या नव्या राजकीय इनिंगकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आनंदराव हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत अनेक वर्षे सावलीसारखे राहिलेले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसपासून ते दुरावले-
कोयना धरणासाठी त्याग करून आनंदराव पाटील यांचे वडील राघोजीराव पाटील हे कुटुबांसह कराड तालुक्यात विस्थापित झाले. कोयना विस्थापितांचे कराडजवळच्या विजयनगरमध्ये पुर्नवसन करण्यात आले. राघोजीराव पाटील यांनी विजयनगरला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन केली. त्यानंतर एनएसयुआयमध्ये सहभागी होऊन आनंदराव पाटील हे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. 1985 ते 2001 इतका दीर्घकाळ ते युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहिले. 2004 पासून 2018 पर्यंत ते काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष होते. तसेच काँग्रेसच्या माध्यमातून कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्यही झाले. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसपासून ते दुरावले. त्यांचे दोन्ही सुपूत्र आणि पुतण्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तेव्हापासून आनंदराव पाटील यांच्या भुमिकेकडे लक्ष होते. तथापि, त्यांची भूमिका आजअखेर गुलदस्त्यात आहे.
आज करणार शक्ती प्रदर्शन-
शिवजयंतीदिनी (शुक्रवारी) आनंदराव पाटील यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांचे कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने आनंदराव पाटील हे आपली आगामी राजकीय भूमिका जाहीर करतील, अशी शक्यता होती. परंतु, ते कराड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडी झाल्यानंतर जाहीर कार्यक्रम घेऊन आगामी वाटचाल स्पष्ट करणार आहेत.
ईटीव्ही भारतशी बोलताना आनंदराव पाटील म्हणाले की, मी विधान परिषद सदस्यत्वाच्या अंतिम काळात 20 लाखाचा निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी दिला आहे. त्या निधीतून ग्रामपंचायतींना साहित्यांचे वाटप करणार आहेत. दि. 23, 24 रोजी कराड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडी होणार आहेत. त्यानंतर कार्यक्रम घेऊन ग्रामपंचायतींना साहित्य वितरित केले जाणार आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या विचारांनुसार आपण भविष्यातील राजकीय वाटचाल स्पष्ट करणार आहोत.
माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची सावली म्हणून ओळखले जाणारे आनंदराव पाटील हे काँग्रेसपासून दुरावल्यानंतर अनेक दिवस शांत होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय भुमिकेबद्दल सातारा जिल्ह्यात उत्सुकता होती. तथापि, आता ते पुन्हा सक्रिय होण्याच्या विचारात असून त्यांच्या नव्या राजकीय भुमिकेकडे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.