सातारा - कोरोनामुळे निर्माण झालेल्या अर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले १ ट्रिलियन डॉलर (७६ लाख कोटी रुपये) किंमतीचे सोने सरकारने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
कोरोना साथीमुळे देशावर आलेले आतापर्यंतचे हे सर्वात अवघड संकट आहे, असे ते म्हणाले. लोकांना दोन महिने काम नाही. त्यामुळे पगार मिळालेले नाहीत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार देशातील विविध देवस्थान ट्रस्टकडे १ ट्रिलियन डॉलर (७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने ताबडतोब ते सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर घ्यावे. कारण, ती राष्ट्राची संपत्ती आहे. ते सोने वापरात आणून जनतेचा जीव वाचविला पाहिजे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.