सातारा - कोरोना संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठाकाणी गोर गरिबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अन्न-धान्य, वस्तुंच्या स्वरुपात गरजूंना मदतीचे वाटप केले जात आहे. परंतू, मदत वाटप करताना सोशल डिस्टन्सींग पाळावे. गरजू व्यक्ती, कुटुंबाला मदतीचे वाटप करावयाचे असल्यास कार्यक्रम न घेता घरपोच मदत द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. तसेच कोणत्याही प्रकारची छायाचित्रे घेऊ नका असेही ते म्हणाले.
![satara collector](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/str-collector-order_11042020174222_1104f_1586607142_991.jpg)
सध्या देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे परप्रांतीय, स्थलांतरीत व गरजू नागरिकांना काही अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत केली जात आहे.
शहरी भागात गरजुंना मदतीचे वाटप करावयाचे झाल्यास अशासकीय संस्था, स्वयंसेवकांनी नागरिकांना वैयक्तिकपणे मदतीचे वाटप न करता संबंधीत तालुक्याचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या सल्ल्यानुसार सोशल डिस्टन्सींग पाळून वाटप करावे. तसेच ग्रामीण भागात मदतीचे वाटप करताना वैयक्तिक न करता संबंधीत तालुक्याचे तहसीलदार, सहायक पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार सोशल डिस्टन्सींग पाळून वाटप करावे, असे आवाहन जिल्ह्याधिकाऱ्यांनी केले.
मदतीचे वाटप करताना कोणत्याही प्रकारचे छायाचित्र काढण्यास सक्त मनाई आहे. मदतीचे वाटप करताना मास्क, हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.