सातारा - शहरातील बोगदा परिसरात एका तरुणाला वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडले आहे. दहा-पंधरा तरुणांची गर्दी गोळा करून जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 'बर्थडे बॉय'वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बोगदा परिसरातील साई विहार अपार्टमेंट येथील आंब्याच्या झाडाजवळ रविवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास १० ते १५ मुलांची गर्दी जमली असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर रात्री गस्त घालणारे बीट अंमलदार घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून सर्वजण पळून गेले. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता पॉवर हाऊस झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुणाचा अंडी फोडत केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे समजले. त्या तरुणाचे आई-वडील व आजोबांनीही दुजोरा दिला. पोलिसांनी खात्री पटल्यानंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग आदी कलमांखाली शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.