सातारा - वाईतील ब्राम्हो समाजाच्या इमारतीत असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची मुलींची शाळा पाडल्याप्रकरणी वाई न्यायालयाने पोलिसांना ब्राम्हो समाजाच्या अध्यक्षा मीनल साबळे, त्यांचे पती राजेंद्र साबळे व इतर सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान वाई पोलिसांनी संबंधितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सुटीच्या दिवशी पाडली शाळा
वाईच्या ब्राम्हो समाजाची इमारत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने शाळेकरिता भाड्याने घेतली होती. या इमारतीत अनेक वर्षांपासून गर्ल्स हायस्कूल चालवले जात होते. ब्राम्हो समाजाच्या अध्यक्षा मीनल साबळे व त्यांचे पती राजेंद्र साबळे यांनी नगरपालिका प्रशासनाकडून शाळेची इमारत धोकादायक असल्याचे पत्र मिळवून, रविवारी सुटीच्या दिवशी ही इमारत पाडली.
शालेय साहित्याची चोरी
शाळेचे शैक्षणिक साहित्य ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात असताना शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा ठोंबरे व त्यांचे पती याच दरम्यान शाळेच्या समोरून जात होते. त्यांना शाळेचे कुलूप तोडल्याचे दिसले. ते आत गेले असता त्यांना साबळे पती पत्नी व अन्य सात ते आठ लोक शैक्षणिक साहित्य ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याचे दिसून आले. ठोंबरे पती पत्नीला दमदाटी करून, साबळे यांच्या सोबत आलेल्या अन्य लोकांनी हे सर्व साहित्य टॅक्टमध्ये भरून नेले.
शाळेची न्यायालयात धाव
दरम्यान मुख्याध्यापिका ठोंबरे यांनी सर्वप्रथम या घटनेची माहिती संस्थेचे सहसचिव राजेंद्र शेजवळ यांना दिली. त्यांनंतर मुख्याध्यापिका ठोंबरे या तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल न केल्याने, शाळा व्यवस्थापनाने यांची माहिती पोलीस अधीक्षकांना देऊन, न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाने संशयितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.