सातारा : पाटेश्वर (ता. सातारा) (Pateshwar Satara) येथे विवाह सोहळ्यात अक्षता फेकून मारण्याच्या कारणावरून वऱ्हाडींमध्ये चांगलीच धुमश्चक्री उडाली. नवरा मुलाकडील नातेवाइकांनी नवरी मुलीवर अक्षता टाकताना इतर नातेवाइकांना अक्षता मारल्या, यात दोन्ही वऱ्हाडींमध्ये चांगलीच जुपली. प्रकरण बोरगाव पोलिस ठाण्यापर्यंत (Borgaon Police Station) पोहोचले. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
अक्षता मारल्याचा आरोप : सातारा तालुक्यातील पाटेश्वरनगर येथील मंगल कार्यालय एक लग्न सोहळा सुरू होता. लग्नाच्या वेळी मंगलाष्टका सुरू असताना शेवटच्या मंगलाष्टकेच्या वेळी मुलीकडच्या नातेवाइकांच्या भाच्याने मुलाकडील नातेवाइकांना तुमच्या नातेवाइकांनी टाकलेल्या अक्षता आम्हांला लागल्या आहेत, असे म्हणत अश्लील शिवीगाळ करीत दमदाटी केली.
अशा प्रकारे भांडणे वाढली : त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिला, नातेवाइकांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या दोन बहिणींना मारहाण झाली. या मारहाणीत गरोदर असलेल्या एका महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वादाचे पर्यावसान मारामारीत : नवरा मुलाकडील नातेवाइकांनी मंगलाष्टका सुरू असताना नवरी मुलीस अक्षता फेकून मारल्याचा आरोप झाला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर वाद वाढल्याने मारामारी झाली. यावरून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाले असून, बोरगाव (ता. सातारा) पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा : Poisoning in a wedding : निलंगा तालूक्यात लग्नाच्या जेवणामधून सुमारे 300 जणांना विषबाधा