सातारा - माण तालुक्यातील मनकर्णवाडी येथे जमिनीच्या वादातून मामा-भाच्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. कुऱ्हाड आणि काठ्यांचा वापर करुन झालेल्या या हाणामारीत भाचे जगदाळे यांच्यागटातील तिघे गंभीर आणि मामा मोहिते यांच्याकडील पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मनकर्णवाडी येथील मोहिते आणि जगदाळे कुटुंबाचे शेतीच्या कारणावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यांच्यात अनेकदा किरकोळ वाद झाले आहेत. रविवारी रात्री दोन्ही कुटुंबामध्ये पुन्हा वाद सुरू झाला हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये बाळू आवबा मोहिते, नारायण आवबा मोहिते, आप्पासाहेब मोहिते, लालासाहेब मोहिते, किरण नारायण मोहिते, आकाश नारायण मोहिते, दत्तात्रय मोहिते, सुनील बाळकु मोहिते, अनिल बाळकु मोहिते, मल्हारी अप्पा मोहिते, ज्योतीराम अप्पा मोहिते, रा.मणकर्णवाडी या सर्वांनी कुऱ्हाड, काठी आणि दगडांनी महादेव कृष्णा जगदाळे, सुनिल विठ्ठल जगदाळे, विठ्ठल महादेव जगदाळे, दशरथ महादेव जगदाळे, अमोल विठ्ठल जगदाळे, उज्वला विठ्ठल जगदाळे या सर्वांना मारहाण केली. यात विठ्ठल जगदाळे यांच्या पायावर कुऱ्हाडीचा घाव घालण्यात आले.
जगदाळे कुटुंबातील तीन सदस्यांची परिस्थिती गंभीर असल्याने मोहिते गटावर ३०७ कलमानुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखला करण्यात आला आहे तर मारामारीच्या गुन्ह्यात दोन्ही कुटुंबातील सतरा सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी दिली.