सातारा - सोमजाईनगर वाई येथे युवतीची छेडछाड केल्याप्रकरणी दोन गटात तुंबळ मारामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. सोमजाई नगर, वाई येथे सोमवारी रात्री एक युवती किराणा दुकानात साहित्य आणण्यासाठी गेली होती. यावेळी हृतिक अनिल साठे या तरुणाने तिची छेड काढली. यावेळी तीने घाबरून घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. तेव्हा मुलीचे आई-वडील हृतिकच्या घरी त्याला समजावण्यास गेले. मात्र, मुलाचे वडील अनिल साठे व हृतिक याने युवतीच्या आई-वडिलांनाच मारहाण केली.
संपूर्ण घटनेनंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी युवतीला आणण्यास सांगितले. तेव्हा तरुणीचे चुलता-चुलती तिला घेऊन, पोलीस ठाण्याकडे येत असताना, आनंदा साठे या व्यक्तीने गाडी आडवत पिराजी साठे, प्रकाश साठे, सूरज साठे, सागर वायदंडे यांनी चुलता-चुलतीस लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली.
महिलांना जातीवाचक शिवीगाळ -
युवतीचे पालक व चुलता-चुलतीला मारहाण झाल्याचे समजताच युवतीच्या नातेवाईक रॉकी निवास घाडगे, अर्जुन किरण घाडगे, कृष्णा निवास घाडगे, सनी निवास घाडगे, जॉकी निवास घाडगे, सनी निवास घाडगे, मितवा निवास घाडगे व इतरांनी ऋतिक अनिल साठे यांच्या घरात घुसून प्रापंचिक सामानाची मोडतोड केली. तसेच अनिल साठे, ऋतिक साठे, राजश्री साठे, सागर वायदंडे , पिराजी साठे व महिलांना जातीवाचक शिवीगाळ करत कोयता, लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.
परस्पर विरोधी तक्रारी दाखल -
याप्रकरणी दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधी तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक आशिष कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ऋतिक अनिल साठे ( वय १९), सागर गोरख वायदंडे (वय ३९), पिराजी अनंत साठे (वय ३९), रमेश नेमिनाथ गोसावी (वय ४३), मितवा रमेश गोसावी (वय ३६), पल्लवी रमेश गोसावी (वय २०, सर्व रा. सोमजाई नगर) यांना अटक केली. इतर संशयित फरार झाले आहेत. पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधित कायदयान्वये (अॅट्रासिटी) गुन्हा दाखल केला आहे.