सातारा : अत्याचारानंतर गरोदर राहिलेल्या मुलीची घरीच प्रसुती करून निर्दयी बापाने जन्मलेल्या बाळाचे शीर धडावेगळे केल्याचा प्रकार पोक्सो गुन्ह्याच्या तपासामध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या बापावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाटण तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. त्यातून ती साडेआठ महिन्यांची गर्भवती राहिली होती. याप्रकरणी एका तरूणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, तपासाच्या अनुषंगाने पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात नेण्यात आले. तेव्हा मुलीच्या पोटात गर्भ नसल्याचे वैद्यकीय अधिकार्यांच्या निदर्शनास आले.
बापाने मुलीची घरीच केली प्रसुती : पीडित मुलीच्या पोटात गर्भ नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली. त्यावेळी मुलीने चौकशीत जी माहिती दिली ती ऐकून तपास अधिकारी हादरून गेले. वडिलांनी घरीच प्रसूती केली. जन्मलेले बाळ रडल्यामुळे शेजार्यांना कळेल म्हणून बाळाचे तोंड दाबून त्याचे शीर धडावेगळे केल्याची माहिती पीडित मुलीने दिली. मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी निर्दयी बापावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
गळा चिरून शीर टाकले नाल्यात : जन्मलेल्या बाळाचा गळा चिरल्यानंतर धडावेगळे केलेले शीर नाल्यामध्ये टाकून पीडित मुलीच्या बापाने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. तसेच पीडित मुलीच्या बापाला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसर हादरला आहे.
अत्याचार्यासह पीडितेचा बाप पोलीस कोठडीत : अल्पवयीन मुलीच्या अत्याचार करणार्याला पोक्सो गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यातच पीडितेच्या बापाला अटक झाली आहे. तो देखील पोलीस कोठडीत आहे. पोक्सो गुन्ह्याचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील करत आहेत. बाळाचा गळा चिरून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी करत आहेत.